Rakhmabai Raut

रखमाबाई राऊत-(१८६४-१९५५)

आईच्या पुनर्विवाहानंतर छोटी रखमा डॉक्टर सखाराम अर्जुन राऊत यांची मुलगी झाली. लग्न ठरण्यापूर्वी त्यांच्या आई जयंतीबाईंनी डॉक्टरांना पत्र लिहून लग्न करण्याची इच्छा कळवली होती. डॉक्टर राऊतांच्या घरी राहून रखमाबाई प्रगल्भ होत गेल्या. परंतु आजोबांनी आणलेल्या स्थळाशी वयाच्या ११व्य वर्षी लग्न करावे लागले होते. लग्नात त्यांच्या पतीचे (दादाजी ठाकूर) याचे वय सतरा होते. त्या काळाच्या प्रथेनुसार वयात येईपर्यंत रखमाबाई माहेरीच होत्या. नंतरही ८ वर्षे त्यांचा नवरा त्यांना घ्यायला आला नाही. दादाजी हे मामाच्या संगतीत राहून दुर्गुणी झाले होते. रखमाबाईंना त्यांच्या सख्या वडिलांनी ठेवले पैसे याच काळात मिळाले होते. दादाजींनी आता रखमाबाईंना घरी चलण्याचा तगादा लावला. रखमाबाईंना मात्र सासरी जायची इच्छा नव्हती. डॉ. राऊतांनी दादाजींना तसे कळवले. दादाजींनी ‘वैवाहिक हक्क’प्रस्थापित करण्याच्या कलमाखाली रखमाबाईंना कायदेशीर नोटीस पाठवली. याला रखमाबाईंनी संस्कार व मानसिकतेतील विषमतेचे कारण कळवले. अजाणत्या वयातले लग्न मान्य नाही असे उत्तर कळवले. व्यक्तिस्वातंत्र्याच्या या लढ्यात रखमाबाईंना आई,वडील व आजोबा यांची भक्कम साथ मिळाली. दादाजी विरुद्ध रखमाबाई हि केस कोर्टात गाजू लागली होती. बायको नांदायला यावी म्हणून नवऱ्याने बायकोवर केलेली प्रतिष्ठित वर्गातील हि पहिलीच केस असावी. हळूहळू या पतिपत्नीतील वादाला समाजातील सनातनी विरुद्ध सुधारक असे स्वरूप प्राप्त झाले. मुलीच्या पैशाच्या लोभाने तिला सासरी पाठवत नाहीत असा अपप्रचार सुरु झाला. 

रखमाबाईंनी टाइम्स मधून टोपणनाव घेऊन बालविवाहाचे करूण परिणाम सांगणारी पत्रे लिहायला सुरुवात केली. इंग्लंडमधून उदारमतवादी स्त्री पुरुषांची त्यांना भरपूर सहानुभूती मिळाली. या अन्यायाविरुद्ध तेथील वृत्तपत्रात आवाज उठवला गेला. शेवटी वर्षभराने खटल्याचा निकाल रखमाबाईंच्या बाजूने लागला. दादाजींनी हि केस हायकोर्टात नेली. इंग्रज सत्ताधाऱ्यांना आता सनातनी समाजाच्या प्रक्षोभाला बाली पडायचे नव्हते. त्यामुळे सरन्यायाधीशांनी खालच्या कोर्टाचा निकाल चुकीचा ठरवत रखमाबाईंनी एका महिन्याच्या आत सासरी जावे नाहीतर सहा महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा स्वीकारावी असा निर्णय दिला. रखमाबाईंनी दुसरा पर्याय निवडला. रखमाबाईंनी हे पंडिता रमाबाईंना अमेरिकेत पत्राने कळवले. पंडित रमाबाई, न्यायमूर्ती रानडे हे रखमाबाईंसोबत खंबीर उभे राहिले व प्रिव्ही कौंसिलमध्ये केस नेण्याची तयारी चालू केली. परंतु आता दादाजींनी माघार घेतली व २०० रु घेऊन खटला मागे घेतला. 

यापुढे रखमाबाई गव्हर्नरच्या अर्थसहाय्य योजनेतून वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेल्या. डॉक्टर होऊन परतल्यावर सुरुवातीस मुंबई व नंतर २० वर्षे सुरत इथे त्यांनी वैद्यकीय सेवा दिली. सुरत येथील हॉस्पिटल त्यांच्याच नावाने ओळखले जाते. निवृत्त झाल्यावर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. वयाच्या नव्वदीत त्यांचे निधन झाले. 

-गायत्री भालेराव
एम.ए(इतिहास),एम.ए(इंडॅालॅाजी),एम.फिल.(इतिहास)

 

वीडियो-रखमाबाई राऊत–गायत्री भालेराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *