काशीबाई कानिटकर-(१८६१-१९४८)
काशीबाई कानिटकर या मराठीतल्या आद्य चरित्रलेखिका होत. वयाच्या ९व्या वर्षी त्यांचे लग्न वकील गोविंदराव कानिटकर यांच्याशी झाले. ते सुधारणावादी होते. काशीबाई गोविंदरावांच्या समोर रूपाने उजव्या नव्हत्या. परंतु शिकलीसवरली तर संसार होऊ शकतो असे गोविंदरावांचे म्हणणे होते. त्यामुळे काशीबाईंनी चोरून शिकण्यास सुरुवात केली. त्यांचा भाऊ त्यांना धार्मिक पुस्तके आणून देई. यातूनच त्यांना वाचनाचा छंद लागला. सासरचे लोक जुन्या वळणाचे होते, त्यांना स्त्रियांनी शिक्षण घेतलेले आवडत नसे, आणि गोविंदरावांना बायकोला व्याख्यानांना समारंभांना बरोबर न्यायाचे असायचे. अशा कात्रीत काशीबाई अडकल्या होत्या. गोविंदरावांनी काशीबाईंना इंग्रजी शिकवायला सुरुवात केल्यावर घरच्यांचा त्रास अजूनच वाढला. प्रार्थना समाजाच्या रविवार दुपारच्या शाळेत त्या जात असत. तिथे लिहिलेला ‘पूर्वीच्या स्त्रिया व हल्लीच्या स्त्रिया’ हा निबंध ‘सुबोधपत्रिके’त छापून आला. या अपराधाची फळे त्यांना घरी भोगावीच लागली. या सुमारास गोविंदरावांकडून त्या संस्कृत व इंग्रजी साहित्य समजून घेत होत्या. पंडिता रमाबाईंच्या ‘आर्य महिला समाज’ मध्येही त्या जात असत. हरिभाऊ आपट्यांशी या पतिपत्नींचा स्नेह जुळला गेला. हरिभाऊंनी ‘गणपतराव’ या कादंबरीतले आदर्श जोडपे या दोघांवरूनच रंगवले होते.
काशीबाईंची आद्य चरित्रलेखिका म्हणून ओळख झाली ती डॉ. आनंदीबाई जोशी यांची चरित्रकर्ती म्हणून. या त्यांच्या पहिल्याच साहित्यकृतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या पतीला दिले.
पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदना’च्या उद्धाटनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले.
‘रंगराव’, ‘पालखीचा गोंडा’ अशा कादंबऱ्या तर ‘चांदण्यातील गप्पा’ व ‘शिळोप्याच्या गोष्टी’ असे कथासंग्रह त्यांनी लिहिले. मराठीतल्या आद्य कथा लेखिका सुद्धा काशीबाईच आहेत.
राष्ट्रीय सभेत जाणारी पहिली हिंदू स्त्री या काशीबाईच आहेत. रमाबाई रानड्यांबरोबर त्या ‘भारत महिला परिषदे’त हि गेल्या होत्या. वसंत व्याख्यानमालेच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा होण्याचा मान ही काशीबाईंकडेच जातो. अनेक व्याख्यानांना त्या नऊवारी,सौभाग्यालंकार,वरती शाल पांघरून जात असत. हे सर्व करून गृहकृत्ये,मुलांविषयीची कर्तव्ये,कुलधर्म,कुलाचार सगळे करत असत.त्यामुळे केसरीकारांनी पण काशीबाईची स्तुती केलेली दिसते. त्यांचे उत्तर आयुष्य मात्र चांगले गेले नाही. गोविंदरावांचे मत त्यांच्याबद्दल बदलत गेले आणि गृहकलहाचा त्यांना सामना करावा लागला.
-गायत्री भालेराव
एम.ए.(इतिहास), एम.ए.(इन्डोलॅाजी), एम.फिल. (इतिहास).
वीडियो – काशीबाई कानिटकर-गायत्री भालेराव
