पार्वतीबाई आठवले-(१८७०-१९५५)
पार्वतीबाई या बाया कर्वे यांच्या लहान भगिनी होत्या. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांचे लग्न पायातून अधू असणाऱ्या मुलाशी झाले. विसांव्या वर्षी पतीचे निधन झाल्याने त्या लहानग्या नारायणाला घेऊन माहेरी आल्या. काही दिवसातच बाया कर्वे यांनी नारायणाच्या शिक्षणासाठी त्यांना पुण्यात बोलावले. याचवेळी अण्णांनी अनाथ बालिकाश्रम काढला होता. बायांनी पार्वतीबाईंना हुजुरपागेत दुसऱ्या इयत्तेत घातले, सत्तावीस वर्षांची ही विकेशा लहान मुलींबरोबर शिकू लागली. भराभर पास होत ट्रेनिंगची स्कॉलरशिप मिळवून पहिल्या वर्गात पास झाल्या. पुढे हिंगण्याच्या आश्रमात त्या अण्णांच्या सहायक म्हणून रुजू झाल्या. पार्वतीबाई या हिंगण्याच्या आश्रमाच्या पहिल्या आजन्म सेविका होत्या. त्या आश्रमातल्या लेडी सुप्रिटेंडन्ट होत्या तरी गड्यापासून ते व्यवस्थापकांपर्यंतची सगळी कामे त्या करायच्या. शाळा,घर आणि वसतिगृह या तिन्ही गोष्टींकडे त्यांना लक्ष द्यावे लागायचे. पुढच्या काळात त्यांना बनुताई देशपांडे,वेणूताई नामजोशी,काशीताई देवधर या त्यांना मदतनीस मिळाल्या.
पुढे वर्गणी गोळा करण्याचे काम त्यांनी अंगावर घेतले, त्यासाठी त्यांना गावोगावी आश्रमाची माहिती देत भाषणे करावी लागत होती. १९०४ च्या सामाजिक परिषदेत त्यांनी भाषण केले. यापुढची २० वर्षे त्या अव्याहतपणे भारतभर फिरल्या. दरवर्षी जवळपास सरासरी तीन हजार रुपये वर्गणी गोळा करीत. जिथे स्त्रीशिक्षणाच्या जास्त विरोध असे तिथूनही त्या थोडीफार का होईना वर्गणी गोळा करत असत.
नारायण मोठा झाल्यावर त्यांनी स्वतःचे केशवपन करणे बंद केले. आश्रमातील विधवांनी नापितापुढे डोके देण्यापेक्षा एकमेकींचे केशवपन करावे असे त्या सांगत.
वर्गणीसाठी त्यांना दूरदूर फिरावे लागे, तेव्हा इंग्रजीचे ज्ञान आवश्यक म्हणून त्यांनी चाळीसाव्या वर्षी इंग्रजी शिकायचे ठरवले. अण्णांनी त्यांना थेट अमेरिकेतच पाठवायचे ठरवले. धर्मानंद कोसंबींच्या सोबतीने पार्वतीबाई अमेरिकेला पोहोचल्या. प्रवासाच्या तयारीची योग्य माहिती न मिळाल्याने खाणेपिणे,गरम कपडे इ. बाबतीत त्यांचे बोटीवर खूप हाल झाले. अपुरे पैसे, दुखणे यांना पार्वतीबाईंनी ज्या समर्थपणे तोंड दिले ती हकीकत मुळातूनच वाचण्यासारखी आहे. ‘माझे पुराण’
या आत्मचरित्रात पार्वतीबाईंच्या या अमेरिका दौऱ्यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळते. अत्यंत धीराने व चिकाटीने पार्वतीबाईंनी कधी मोलकरणीची कामे करत , घरोघरी जाऊन पुस्तके विकत, कधी हॉस्पिटलमध्ये नोकरी करून करारीपणे अमेरिकेत मुक्काम केला.
न्यूयॉर्कमध्ये त्यांची ‘यंग इंडिया’च्या कचेरीत लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली. तिथे ओळखी वाढत त्यांना आंतरराष्ट्रीय मजूर परिषदेत भाग घेण्याची संधी मिळाली. त्यातून ज्ञान, अनुभव व स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल जागतिक भान मिळाले. अमेरिकेत घेतलेल्या सभांच्या परिणामस्वरूप संस्थेला मोटरबस मिळाली.
परतीच्या प्रवासात रवींद्रनाथ टागोर त्यांच्या सोबत होते. पुण्यात परतल्यावर आणलेल्या देणगीचा फंड तातार केला. त्यातून मिळालेल्या व्याजातून गरीब विधवांना मदत केली गेली.
पार्वतीबाईंबद्दल त्यांच्या मुलाने लिहून ठेवले आहे कि, आमच्या घराण्याच्या मूळपुरुषाबद्दल कोणाला माहित नाही पण यापुढे कोणी विचारले तर आमच्या घराण्याचा मूळपुरुष म्हणजे पार्वतीबाई असेच सांगावे लागेल.
-गायत्री भालेराव
एम.ए.(इतिहास) ,एम.ए.(इंडोलॉजी), एम.फील.(इतिहास).
