Laxmibai Tilak

लक्ष्मीबाई टिळक(१८६८-१९३६)

‘साहित्यलक्ष्मी’ लक्ष्मीबाई या कवी नारायण वामन टिळक यांच्या पत्नी. त्याकाळातील अत्यंत सुरेख सहजीवन जगलेले हे जोडपे होते. दोघे यथेच्छ भांडत असत, एकमेकांच्या उणीव,दोष दाखवून देत पण परस्परांविषयीच्या गाढ प्रेमाचा पाया त्यांच्या सहजीवनाला लाभला होता. ज्या काळात स्त्रिया नवऱ्यापुढे मान वरती काढू शकत नव्हत्या, त्याकाळात लक्ष्मीबाई मात्र टिळकांच्या चुका दाखवत, त्यांच्या निर्णयाला विरोध करत असत. टिळक व त्यांचा स्वभाव परस्परविरोधी होता. टिळकांना ख्रिस्तीधर्माची ओढ वाटू लागल्यावरसुद्धा त्यांना लक्ष्मीबाईंच्या प्रेमाने अडकवले होते, परंतु धर्मांतराचा निर्णय पक्का झाल्यावर मात्र त्यांना आपली पत्नी बरोबर नाही याची खंत वाटत होती. टिळकांनी धर्मांतर केल्यावर त्यांच्यातील सुप्त कवित्वशक्ती जागी झाली. कवितेतूनच त्या पतीला उत्तरे पाठवत. दिराने भावाला सूटपत्र द्या म्हणाल्यावर आधी तुमच्या भावाला येऊन बायकोचे नीटनेटके लग्न लावून द्या आणि मग स्वतःचे लग्न करा,असे खंबीरपणे सांगणाऱ्या लक्ष्मीबाई या त्या काळाच्या पुढेच होत्या. ‘तुझ्यावर ख्रिस्ती होण्याची बळजबरी करणार नाही’ असे आश्वासन मिळाल्यावर त्या टिळकांकडे राहायला गेल्या. तिथे राहून जेव्हा त्यांना ख्रिस्ती धर्माबद्दल आत्मीयता निर्माण झाली तेव्हाच त्यांनी धर्मांतर केले. लक्ष्मीबाईंचे शिक्षण हे केवळ लिहिण्यावाचण्यापुरते झालेले होते,तरी जीवनातले बरेवाईट अनुभव घेत त्या उस्फुर्तपणे कविता करू लागल्या. हळूहळू त्या भाषणे पण करू लागल्या.
रेव्हरंड टिळक यांनी ‘ख्रिस्तायन’ हे दीर्घकाव्य लिहायला घेतले होते. हे अर्धवटचं झाले असताना टिळक ख्रिस्तवासी झाले. त्यांच्यानंतर सुमारे १२ वर्षांनी हे दीर्घकाव्य लक्ष्मीबाईंनी पूर्ण केले. एवढी दीर्घ काव्याची रचना करणाऱ्या त्या एकमेव आधुनिक मराठी कवयित्री होत. त्यांच्या स्फुटकाव्यरचना ‘भरली घागर’नावाने प्रसिद्ध झाले आहे. १९२४ पासून त्यांनी मुलाच्या आग्रहाखातर ‘स्मृतिचित्रे’ लिहायला घेतले. या अमर साहित्यकृतीने लक्ष्मीबाईंना ‘साहित्यलक्ष्मी’ हे बिरुद आचार्य अत्रे यांनी दिले. लक्ष्मीबाईंची घरगुती,प्रसन्न, भाषाशैली, खेळकर, सूक्ष्म विनोदी वृत्ती, निर्भयता, जिवंत व्यक्तिचित्रे स्मृतिचित्रांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक बदलांचा इतिहास आहे.
स्मृतिचित्रांची अजून एक मोलाची कामगिरी म्हणजे त्यातील समाविष्ट असणारे बालकवींचे व्यक्तिचित्रण. स्मृतिचित्रांशिवाय बालकवी आपल्याला कळलेच नसते. त्यांच्या काव्याचे आकलन आपल्याला पूर्णपणे करता आले नसते.
डिसेम्बर १९३३ मध्ये त्या नागपूर इथे भरलेल्या ‘ख्रिस्ती साहित्य संमेलन’च्या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या भाषणातून त्यांनी ख्रिस्ती धर्म व भारतीय परंपरा ,संस्कृती यांचा मेळ कास घालता येईल याचे विवेचन केले.
डिसेम्बर १९३५ मध्ये नाशिकमध्ये लक्ष्मीबाईंचा मोठा सत्कार झाला. त्याला आचार्य अत्रे, तात्यासाहेब कोल्हटकर, ह. भ. प. पांगारकर अशा मोठ्या व्यक्तींची भाषणे झाली.
२४ फेब्रुवारी १९३६ रोजी त्या ख्रिस्तवासी झाल्या. टिळकांसारख्यांच्या छायेखाली वावरूनसुद्धा लक्ष्मीबाईंची अस्मिता झाकोळून गेली नाही.

-गायत्री भालेराव
एम.ए.(इतिहास), एम.ए.(इंडोलॉजी), एम.फील.(इतिहास).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *