शकुंतला परांजपे -(१९०६-२०००)
पद्मभूषण, विधानपरिषद सदस्य शकुंतला परांजपे यांचे संततीनियमनाचे कार्य हे खूप मोठे आहे. त्यांचे वडील म्हणजे रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे इंग्लंडला जाऊन गणितातली सिनियर रँग्लर ही अत्यंत मानाची पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. शकुंतला या त्यांच्या एकुलत्या एक मुलगी होत्या. युरोपात केम्ब्रिजला शिकायला असताना यूरा स्लेप्टझाॅप या रशियन चित्रकाराशी लग्न केले. घटस्फोटानंतर मुलीला घेऊन त्या पुण्यात माहेरी येऊन राहिल्या. नंतर त्यांनी काही चित्रपटात कामे केली.
मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या आतेभावाने म्हणजेच रघुनाथ धोंडो कर्वे यांनी त्यांना आपल्या संततिनियमनाच्या कामात मदत मागितली. तेव्हा शाकुन्तलाबाईंनी पुण्यातून कुटुंबनियोजनाच्या प्रसारास सुरुवात केली. डेक्कनजवळच्या परांजपेंच्या बंगल्यातून त्यांनी महिलांना संततिनियोजनासाठी खास बनवलेल्या टोप्या, जेली नाममात्र भावात विकायला सुरुवात केली. त्या काळात ‘शकुंतलाबाई या स्त्रियांना स्वतः तपासून योग्य आकाराच्या रबरी टोपीची निवड करून ती वापरण्यासंबंधी संपूर्ण माहिती देतील. टोपीबरोबर वापरावी लागणारी जेली व टोपीही त्यांच्याकडेच विकत मिळेल.’ ही जाहिरात त्या काळात पुण्यात व बाहेरही टवाळीचा विषय झाला होता. नियतकालिकांमध्येही या जाहिरातीबद्दल टीकेचा सूर दिसून येत असे. मात्र शकुन्तलाबाईंनी आपल्या बिनधास्त स्वभावानुसार या टीकेला उडवून लावले.
निरोध आणि गर्भनिरोधकांच्या गोळ्या किंवा संततिनियमनाची कुठलीही पद्धत तोपर्यंत सामान्य लोकच काय पण सुशिक्षित लोकांपर्यंत सुद्धा पोहोचली नव्हती. लैंगिक विषयावर बोलणे किंवा लिहिणे त्या काळात पूर्णपणे निषिद्ध मानले जाई. महर्षी कर्वे यांच्या मुलाने व रँग्लर परांजपे यांच्या मुलीने कामजीवनाबद्दल बोलावे,लिहावे आणि संततिनियमनाचा प्रचार करावा ही गोष्ट त्या काळातल्या सनातनी लोकांना पचनी पडणे अवघडच होते.
शकुंतलाबाई या खंबीर, बंडखोर, प्रवाहाविरुद्ध जाण्याचे बळ असणाऱ्या असल्याने संततिनियमनाची चळवळ त्यांनी १९३८ पासून १९५८ पर्यंत अव्याहतपणे चालवली. १९५८ ते १९६४ शकुंतलाबाई महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभासद होत्या. ‘काही आंबट काही गोड’, ‘भिल्लिणिची बोरे’ ही त्यांची मराठी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
-गायत्री भालेराव
एम.ए.(इतिहास), एम.ए.(इंडोलॉजी), एम.फील.(इतिहास).
