बाया/आनंदीबाई कर्वे – (१८६५-१९५०)
गोदुबायाचे लग्न आठव्या वर्षी झाले. लग्नानंतर दोनच महिन्यात त्यांच्या पतीचे निधन झाले. सुरुवातीला सासरी त्यांच्यावर विधवेची कोणतीच बंधने नव्हती. मात्र सासूबाई आजारी पडल्यावर त्यांना केशवपन करावे लागले, बंधने पाळावी लागली. त्यामुळे त्यांच्या भावाने त्यांना आपल्याबरोबर मुंबईस नेले. पंडित रमाबाईंच्या शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी म्हणजे गोदूबाई. शारदा सदन पुण्यात आले तश्या गोदूबाई पण पुण्यात आल्या. अण्णा कर्वे यांची प्रथम पत्नी निवर्तल्याने आणि त्यांना विधवेशीच पुनर्विवाह करायचा असल्याने गोदुबाईंच्या वडिलांनी त्या दोघांना विवाहास विचारले व तयार केले. विवाहात कन्यादान न होता आत्मदान झाले. पं. रमाबाईंनी बायांच्या नावे लग्नाआधी तीन हजार रुपयांची विम्याची पॉलिसी अण्णांकडून काढून घेतली होती.
पुण्यात या विवाहाला नाईलाजाने का होईना पण स्वीकारले गेले,परंतु अण्णांच्या जन्मगावी मुरुडला मात्र त्यांना बहिष्कृत केले गेले. सुरवातीच्या काळात बायांना हळदीकुंकवाला बोलावले तरी घरातील मुलींकडून त्यांना हळदीकुंकू लावत. त्यांचे पहिले बाळंतपण त्या काळाच्या विरोधात म्हणजे सरकारी दवाखान्यात झाले. मुलाचे कान टोचले नाहीत. या मोठ्या मुलाला बरोबर घेऊन नागपूरला जाऊन बाया सुईणीचे काम शिकून आल्या. ‘प्रसंग आलातर पोटापाण्याचे साधन हाती हवे’ असे त्यांचे मत होते. अण्णांनी हिंगण्याच्या माळावर आश्रम काढला. पण बाया पुण्यातच राहिल्या. पुण्यातला अण्णांचा संसार (स्वतःची मुले व इतर सांभाळलेली मुले) बायांनी खंबीरपणे चालवला.
फसलेल्या, समाजाकडून दूर केलेल्या मुली पहिल्यांदा बायांकडेच येत. बाया त्यांना आश्रय देऊन त्यांची लागणे करून देत. आपल्या या कृतीचा आश्रमावर परिणाम होऊ देत नसत.
आश्रमात बिऱ्हाड हलवल्यावर बायांना आश्रमाच्या कामकाजापासून दूर ठेवले जाई. कर्वेंचा पुनर्विवाह समाजाला चालला पण बायांना मात्र उपेक्षा सहन करावी लागली. मुलांच्या शिक्षणासाठी बाया नारायण पेठेत रहायला गेल्या. अनाथ, पोरक्या मुलांना त्या आश्रय देत. गरजूंना मदत करत. सुईणीचे कामही चालूच होते. कुणी हात लावणार नाही अशा किळसवाण्या मुलानांही त्या सांभाळत. नवऱ्याची सावली न होता बायांनी आपले स्वतंत्र विश्व उभे केले होते. अण्णांना नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी बदलायला लावला. निवृत्तीनंतरचे पेन्शन मुलांसाठी राखून ठेवायला लावले. अण्णा परदेशी गेल्यावर बायांनी अण्णांचे आत्मवृत्त विकण्यासाठी ग्वाल्हेर, अहमदाबाद, कशी, लखनौ असा दूर प्रवास केला.
पैसे साठवून त्या आश्रमाला दान देत असत. आश्रमासाठी फिरून त्या भाऊबीज फंड गोळा करत. आपण मुलांना फार काही देऊ शकलो नाही त्यामुळे आपणही मुलांकडून फार अपेक्षा ठेवायला नको असे त्याचे म्हणणे होते. अपघात झाल्यावर अंथरुणात पडून त्यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘माझे पुराण’ लिहून काढले. दिव्याची ज्योत मंद मंद होत विझते तसे त्यांचे निधन झाले.
-गायत्री भालेराव
एम.ए.(इतिहास), एम.ए.(इंडोलॉजी), एम.फिल.(इतिहास).
