जनाक्का शिंदे -(१८७८-१९५६)
जनाक्का शिंदे या विठ्ठल रामजी शिंदे यांच्या भगिनी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. विवाहानंतरही त्यांचे शिक्षण चालू होते. त्यांच्या सासऱ्यांच्या त्यांच्या शिक्षणाला पाठिंबा होता. परंतु त्यांच्या अशिक्षित पतीला मात्र स्वतः हि शिकायचे नव्हतं आणि बायकोने शिकलेलेही चालत नव्हते. सासरी त्रास चालू झाल्यावर जनाक्काना त्यांच्या भावाने माहेरी आणले. विठ्ठल रामजी शिंदेंनी त्यांना पुण्यात आणून हुजुरपागेत घातले. माहेरचेच नाव लावून त्यांचा शाळेत प्रवेश झाला. त्याकाळी शाळेत जाणाऱ्या मुलींना टवाळ लोक खूप त्रास देत असत. शिंदे अशावेळी बहिणीला धीर देत असत. हुजुरपागेच्या वसतिगृहात त्या राहिल्या. हुजुरपागेत इंग्रजी सहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. प्रार्थना समाजातील नवीन व उदार धर्मविचार आवडल्याने त्या नेमाने तिथे जाऊ लागल्या. नंतर प्रार्थना समाजाच्या प्रचारार्थ त्या भावाबरोबर गावोगावी फिरू लागल्या. पनवेल मधील म्युनिसिपल प्राथमिक शाळेत त्या मुख्य शिक्षक झाल्या. परंतु विठ्ठल रामजी शिंदेंच्या ‘निराश्रित सहाय्य्करी मंडळी’ला स्त्री कार्यकर्तीची गरज असल्याने त्या मदतीसाठी मुंबईला गेल्या. या संस्थेतर्फे अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन औषधोपचार करणे, मुलांसाठी शाळा घेणे,वस्त्या स्वच्छ करणे, मुलांना स्वच्छतेची जाणीव करून देऊन चांगल्या सवयी लावणे, भजने शिकवणे, पोथ्या-पुराणे वाचून दाखवणे अशी कामे त्यांनी केली. मिशनरी लोकांसारखी सेवाशुश्रूषा करत असल्याने बाटवण्यासाठी येतात असा पसरलेला समज त्यांनी हळदीकुंकूचे कार्यक्रम घेत दूर केला.
जनाक्कांनी अस्पृश्य महिलांच्या सेवेसाठी ‘निराश्रित सेवासदन’ स्थापन केले. इथे निराधार मुली व महिलांना ठेवले जाई. या मुलींना, स्त्रियांना शिक्षण देणे, नोकरी मिळवून देणे,सामाजिक प्रबोधन व नागरी गुण शिकवणे हे सर्व जनाक्का करत असत. गिरणीत काम करणाऱ्यांची लहान मुले व म्हातारे आईवडील सांभाळणे हे कामही त्यांनी कुटुंबाच्या सहकार्याने सुरु केले.
जनाक्कांनी अस्पृश्य स्त्रियांच्या वैद्यकीय समस्यांकडेही लक्ष दिले. ज्यांचा स्पर्शही विटाळ मानला जात होता, अशा समाजातल्या स्त्रियांच्या बाळंतपणात त्यांना लागणारे औषधोपचार त्यांनी पुरवले. ‘देवदासी’, ‘मुरळी’ म्हणून सोडलेल्या मुलींचे मन वळवून त्यांना सेवासदन मध्ये आश्रय दिला. यात गुप्तरोग झालेल्या मुलींवरही त्या औषधोपचार करत. या मुलींचे शिक्षण व विवाह करून देण्याची जबाबदारी उचलली.
मद्यपानबंदीच्या चळवळीतही जनाक्कांनी वाड्या-वस्त्या फिरून स्त्रीवर्गात प्रचार केला. मुलांच्या बरोबरीने मुलींनाही शिक्षण देण्यात यावे यासाठी पुण्यात मोर्चा काढला. वाई येथे प्रार्थना समाजाची शाखा काढून प्रचारकार्य केले. वनोपासना,नगर संकीर्तन, प्रार्थना समाजाच्या उपासना यात सक्रिय सहभाग घेत लोकांना प्रार्थना समाजाकडे वळवले. महात्मा गांधींनी वाई येथील प्रार्थना समाजाच्या शाखेला भेट दिल्यावर जनाक्काचे कौतुक केले होते.
जनाक्का यांचे आत्मपर लेखन हे स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षित मराठा स्त्रीचे तिला आलेल्या सामाजिक क्षेत्रातल्या अनुभवांवर आधारित लेखन आहे.
पुण्यात शिवाजीनगर येथे एका होरपळणाऱ्या मुलीला वाचवताना त्यातच भाजून त्यांचा मृत्यू झाला.
-गायत्री भालेराव
एम.ए.(इतिहास), एम.ए.(इंडोलॉजी), एम.फिल.(इतिहास).
