पंडिता रमाबाई -(१८५८-१९२२)
रमाबाईंचे वडील अनंतशास्त्री हे विद्वान पंडित होते. कुटुंबाबरोबर तीर्थयात्रा करताकरता रमाबाईंना आजूबाजूची परिस्थिती जाणवत होती. सर्वत्र होणारी स्त्रियांची पिळवणूक, विधवांची दयनीय अवस्था त्यांना दिसत होती. त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह सज्ञान होईपर्यंत करायचा नाही असे ठरवले होते. दुष्काळाच्या निमित्ताने आईवडिलांचे छत्र उडून गेल्यावर त्यांनी भावासोबत जवळपास भारतभर तीर्थाटन केले. त्यामुळे मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड आणि वडिलांकडून शिकलेले संस्कृत या भाषा त्यांना येत होत्या. फिरताफिरता कलकत्त्यात पोहोचल्यावर तिथे त्यांचे स्वागत झाले आणि ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदांनी त्यांना गौरवण्यात आले. भावाच्या मृत्यूनंतर त्यांनी भावाच्या मित्राशी म्हणजे बिपीन बिहारीदास मेधावी यांच्याशी लग्न केले. त्याकाळात परजातीतील पुरुषाशी प्रौढ प्रेमविवाह करणे हे धारिष्ट्याचे होते. अवघ्या २ वर्षांनी पतीच्या झालेल्या मृत्यूनंतर त्या लहान मनोरमेला घेऊन पुण्यात परतल्या. १८८२ मध्ये त्या, रमाबाई रानडे, काशीबाई टिळक इ. सुशिक्षित महिलांनी पुढाकार घेऊन ‘आर्य महिला समाजा’ची स्थापना केली. घातक चालीरीती व दुष्ट रूढी यातून समाजास मुक्त करणे हा याचा उद्देश होता. पुण्यापाठोपाठ नगर,सोलापूर, ठाणे, पंढरपूर, बार्शी येथेही आर्य महिला समाजाच्या शाखा स्थापन झाल्या. पुण्यातील पंचहौद मिशन मधील नन्सच्या ओळखीतून त्या इंग्लंडला गेल्या. ‘स्त्रीधर्मनिती’ आणि ‘माझा इंग्लंडचा प्रवास’ ही दोन पुस्तके लिहून तिथला खर्च भागवला. तिथे ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट होऊन धर्मांतर केले. आनंदीबाई जोशीच्या पदवीदानासाठी त्या अमेरिकेला गेल्या. त्याच्या भाषणाचा प्रभाव पडून तिथे रमाबाई असोसिएशनची स्थापना झाली. त्याच्या भावी कार्यासाठी मदत गोळा होऊ लागली. अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी भेटी दिल्या. मिळालेल्या मदतीतून शिक्षणसाहित्य गोळा केले आणि भारतात परतल्यावर १८८२ मध्ये विधवांसाठी शाळा सुरु केली, शारदा या पहिल्या विद्यार्थिनीच्या नावावरून ‘शारदा सदन’ हे नाव ठेवले. या शाळेला सुरुवातीस सुधारकांचा पाठिंबा होता. परंतु शाळेतल्या मुलीही ख्रस्तीधर्माकडे आकृष्ट होऊ लागल्या . १/२मुली हट्टाने ख्रिस्ती झाल्या, हे समाजाला मान्य होण्यासारखे नव्हते. त्यामुळे पालकांनी आपापल्या मुली काढून घेतल्या. प्लेगची साथ, दुष्काळ यांमुळे केडगावात मुक्ती सदन उभे राहिले. रमाबाईनी चार पाच विधवा स्त्रियांना घेऊन अनाथ रोग्यांची सेवा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या बांबूपासून तंबूपासून ते नंतरच्या छोट्या गावापर्यंत केडगाव विकसित झाले. एकावेळी २-3 हजार माणसे इथे रहात राहत असत. रमाबाईच्या प्रशासन कौशल्याची आपल्याला दाद द्यायलाच हवी. त्याकाळात या विधवा बाईने इतके कर्तृत्व गाजवणे हे काळाच्या पुढचेच होते. त्यांनी आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इत्यादी कामे शिकविली. ‘मुक्तिसदना’त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे मुलींच्या साह्याने उत्पन्न काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता ‘सायं घरकुला’ ची व्यवस्था त्यांनी केली. १९१९ मध्ये रमाबाईंना त्यांच्या या समाजकार्याबद्दल ‘कैसर-ई-हिंद’ हे सुवर्ण पदक देण्यात आले.
अबला स्त्रीयांची मागासलेल्या हालाखिची परिस्थिती, पुरुष व अन्य महिलांकडून त्यांची होणारी पिळवणूक, अनिष्ट रूढी व परंपरा यांविरूद्ध त्यांनी आवाज उठवला. कुमारी मातांसाठी केंद्र, स्त्री साहाय्यता केंद्र, गरीब मुलींसाठी शाळा असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे चालू ठेवली. धर्मांतर करणे म्हणजे भारतीय परंपरा सोडून वागणे हे त्यांना मान्य नव्हते. धर्मांतरानंतरही त्यांनी रमाबाई डोंगरे- मेधावी असेच नाव लावले. अनाथ मुलींची नावे धर्मांतरित झाल्यावरही मराठीच असत. आश्रमात मराठी भजने, मराठी प्रार्थना आणि रीतीरिवाजही मराठीच असत. त्यांचा परदेशी मैत्रिनि मैत्रिणींनाही पाटावर बसूनच जेवावे लागे. प्लेगच्या वेळी सरकारी गलथानपणावरची टीका पाहून लोकमान्य टिळकांसारख्या कट्टर विरोधकानेही त्यांच्या धैर्याची स्तुती केली. स्वाभिमान व देशप्रेम त्यांच्यात ओतप्रोत भरलेले होते. नंतरच्या काळात मात्र रमाबाईंना ख्रिस्ती धर्मातील दोष दिसेनासे झाले आणि त्या प्रगाढ सश्रद्ध होऊन गेल्या . बायबलचे मराठी रूपांतर करून त्या ख्रिस्तवासी झाल्या.
– गायत्री भालेराव
एम.ए(इतिहास),एम.ए(इंडॅालॅाजी),एम.फिल.(इतिहास)
