रमाबाई रानडे-(१८६२-१९२४)
वयाच्या अकराव्या वर्षी महादेव गोविंद रानडेंसारख्या सुधारकांची द्वितीय पत्नी म्हणून रमाबाई पुण्यात आल्या. महादेव रानड्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न झाले असले तरी रमाबाईंनी मात्र पतीला साजेसे होण्याचे मनोमन ठरवले होते. लिहिण्यावाचण्याने स्त्री विधवा होते हा माहेरचा समज मागे सोडून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीपासून हातात पाटी-पेन्सिल, अंकलिपी आली आणि नववधूची शिष्या झाली. रात्री २ तास पहाटे लवकर उठून हा अभ्यास चाले. छोट्या रमेला अभ्यासाची गोडी लागली, आणि तिला इंग्रजी शिकावेसे वाटू लागले.
रमाबाईंचे शिक्षण पोथ्यापुराणे आणि हिशोब यांपलीकडे जाऊ लागल्यावर घरातील ज्येष्ठ स्त्रियांचा त्यांना विरोध सुरु झाला. टोमणे मारणे, अबोला धरणे, घालूनपाडून बोलणे, बहिष्कृतासारखे वागवणे सुरु झाले. परंतु रानडे त्यांची समजूत काढत.
त्यांना इंग्रजी शिकवायला मिस हरफर्ड या येत असत. १८८१ मध्ये पुण्यातील सुधारकांनी एक स्त्री-सभा सुरु केली होती,त्यात विविध शास्त्रीय विषय सोपे करून शिकवले जात. तिथेही रमाबाई जात असत. हुजुरपागेच्या स्थापनेपूर्वी झालेल्या सभेत त्यांनी इंग्रजीतून भाषण वाचले आणि घरातील वरिष्ठांचा रोष ओढवून घेतला. पंडिता रमाबाईंच्या आर्य महिला समाजातही त्या जात असत. महादेवरावांची पुण्याबाहेर बदली झाल्यावर मात्र त्यांच्या सहजीवनात परिपक्वता आली . मुंबईत त्यांनी ‘हिंदू लेडीज सोशल क्लब’ ची स्थापना करून स्त्रियांसाठी अभ्यासवर्ग, शिवणक्लास सुरु केले. यानंतर रमाबाई समाजकार्यकर्त्या म्हणून नावजल्या गेल्या. त्यांच्या सुखी सहजीवनाचा पायंडा आदर्श ठरला होता.
न्यायमूर्ती रानडेंच्या मृत्यूनंतर कर्मयोगाला धरून त्यांनी प्रार्थनासमाजातील धर्मपर व्याख्यानाचे पुस्तक प्रकाशित केले. पुण्यातही ‘सोशल क्लब’ची स्थापना केली. १९०४ मध्ये ‘अखिल भारतीय महिला परिषदे’चे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले. येरवडा तुरुंगाच्या त्या मानद अधिकारी झाल्या. गुन्हेगार स्त्रियांना साक्षर करणे, सदाचार व सामुदायिक अभंगगायन करायला त्यांनी शिकवले.
१९०९ मध्ये त्यांनी स्त्रीशिक्षण, स्त्रियांच्या कर्तुत्वाला वाव देणे, विधवांना स्वतःच्या पायावर उभे करणे, यासाठी राहत्या वाड्यातील जागा, सामानसुमान, इत्यादी देऊन सेवासदन या संस्थेची स्थापना केली. रमाबाईंसारखे चारित्र्यसंपन्न, विनम्र, सर्वसंग्राहक नेतृत्त्व सेवासदनला मिळाल्याने समाजातील सर्व थरातून सहकार्य मिळाले. मोठमोठया व्यक्तींनी सेवासदनला भेटी दिल्या. स्त्रिया स्वावलंबी होतील असा अभ्यासक्रम इथे शिकवला जाई. रमाबाईंनी स्त्रियांना नर्सिंग शिकवण्याची सोय ससूनला केली होती. यंत्रावर पायमोजे शिवणे, अनेक छंदवर्ग त्यांनी सुरु केले. वाचनालये चालू केली. सेवासदनची भरभराट होत होती. पुण्यात पहिला आनंदमेळा (fun-fare) रमाबाईंनी भरवले होते. संस्थेच्या मदतीसाठी झालेल्या नाट्यप्रयोगाला स्त्री-पुरुष एकत्र बसले होते, हे त्या काळातील मोठेच पाऊल म्हणावे लागेल.
सक्तीचे प्राथमिक शिक्षण, स्त्रीचा मताधिकार आणि स्त्रियांना विधिमंडळात प्रतिनिधित्व या तिन्ही अखिल भारतीय आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. ही आंदोलने यशस्वी झाली.
पतिनिधनानंतर उर्वरित आयुष्य त्यांनी व्रतस्थपणे, शालीनतेने, पतीचा सन्मान ठेवून घालवले.
– गायत्री भालेराव
एम.ए(इतिहास),एम.ए(इंडॅालॅाजी),एम.फिल.(इतिहास)
